श्वेतकोशिकार्बुद
श्वेतकोशिकार्बुद : ‘रक्ताचा कर्करोग’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या विकारामध्ये श्वेतकोशिकांची (पांढऱ्या पेशींची) अनिर्बंध निर्मिती होत असते, इतर सर्व प्रकारच्या कर्करोगाप्रमाणेच ही विकृती असली, तरी अनियंत्रित प्रमाणात वाढणार्या या कोशिका इतरत्र न जाता केवळ रक्तातच प्रचंड प्रमाणात सोडल्या जातात, हे या विकाराचे वैशिष्ट्य आहे [⟶ कर्करोग].